कन्नड – मला लोकसभेत पाठवले
तरच तुमचे जमेल. नाहीतर म्हातारे झालात तरी तुमची स्वप्नपूर्ती होणार नाही. असा
टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माजी आमदार नितीन पाटील यांना लगावला. ते
म्हणाले, ‘मी लोकसभेत गेलो तरच
कन्नडची जागा रिकामी होईल आणि तुमचे जमेल.’ हर्षवर्धन जाधव
यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा याआधीच व्यक्त केलेली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत औरंगाबादची जागा नेहमी काँग्रेस लढवत आली
आहे. मागील निवडणुकीत नितीन पाटील येथून काँग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळे आमदार
जाधव यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तळात चर्चा आहे.
कन्नड तालुक्यात नुकत्याच
झालेल्या एका कार्यक्रमात आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार आणि काँग्रेस नेत
नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे एकाच मंचावर आले होते. यावेळी
त्यांच्यात जुगलबंदी रंगली. हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा
राजीनामा दिलेला आहे. मात्र त्यांचा राजीनामा अजून मंजूर झालेला नाही. त्यावरुन
कोल्हे यांनी, आमदार जाधव यांना कोपरखळी मारली. ‘तुम्हाला आजी आमदार म्हणावे
की माजी आमदार असा पेच निर्माण झाला आहे.’ यातून मार्ग काढत त्यांनी आमदार जाधव यांनी
नव्याने स्थापन केलेल्या बहुजन स्वराज पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांना संबोधले.
माजी आमदार नितीन पाटील म्हणाले, ‘हर्षवर्धन जाधव तुम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ नका. तुमचा राजीनामाही स्वीकारला जाणार नाही. रिव्हर्स गियर टाकण्याऐवजी तुम्ही आगामी लोकसभा निवडणूक लढवा आणि दिल्लीत विराजमान व्हा.’ २०१४ मध्ये औरंगाबाद लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार राहिलेले माजी आमदार पाटील यांच्या या विधानावर हर्षवर्धन जाधव म्हणाले, ‘विरोधकांना मला दिल्लीत पाठवण्याची घाई झाली आहे. तुम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरच ते जमेल.’ त्यासोबतच आमदार जाधव म्हणाले, की मी लोकसभेत गेलो तरच कन्नडची जागा रिकामी होणार आणि तुमचे जमेल.










